सातारचे राजे पुन्हा आमने-सामने? नगरसेवक जागा वाटपानंतर आता नगराध्यक्ष पदावरून उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंमध्ये मतभेद?

सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या मनोमिलनाने राजकीय वर्तुळात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. नगरसेवक जागा वाटपावर दोघांमध्ये तात्पुरती एकवाक्यता दिसून आली असली तरी आता नगराध्यक्ष पदाच्या वाटपावरून पुन्हा मतभेद उफाळले असल्याचे समोर येत आहे.

रात्री फर्न हॉटेल येथे दोन्ही राजेंमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या सूचक विधानांमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. उदयनराजेंनी स्पष्ट शब्दात काहीही न सांगता, नगराध्यक्ष पदाबाबतची ‘संधी देण्याइतपत मी मोठा नाही’ असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नगराध्यक्ष पद कोणाच्या पथ्यावर पडावे — शिवेंद्रसिंहराजे गटातील उमेदवार की उदयनराजे गटातील? — यावरून चर्चा तापलेली आहे. दोन्ही बाजूंनी आपापले संघटनात्मक बळ दाखविण्याची तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या घडामोडींमुळे साताऱ्यातील भाजप-राजे समीकरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “दोन्ही राजे एकत्र आले तर साताऱ्यात भाजपला मोठा फायदा होईल,” तर काहीजणांचे मत आहे की “नगराध्यक्ष पदावरून पुन्हा मतभेद झाले तर मनोमिलन टिकणे कठीण होईल.”

राजकारणातील जाणकारांच्या मते, सातारा नगरपालिकेतील सत्तेची किल्ली नगराध्यक्ष पदावरच अवलंबून आहे. त्यामुळे या पदावर दोन्ही राजेंमध्ये एकवाक्यता होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा, दोन्ही गटांतील मतभेद पुन्हा उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता सर्वांचे लक्ष या दोन्ही राजेंच्या पुढील बैठकीकडे लागले आहे — कारण साताऱ्यातील आगामी निवडणुकीचे समीकरण या बैठकीतूनच ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

Comments